
भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचा इशारा दिला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून, व्यापक पावसासोबतच काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी या काळात अधिकृत सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. पूरप्रवण किंवा धोकादायक भागात जाणे टाळावे. विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली थांबू नये. पूराच्या परिस्थितीत बचावासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे महत्त्वाचे असून, गरज भासल्यास स्थानिक निवारा केंद्रांचा उपयोग करावा. तसेच नदी-नाल्यांवरुन पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूरस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाने केले आहे.


