राज्यभरात मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते वाहतुकीसह सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारकडून बचावकार्य व जनतेला मदत पुरवण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. अशा वेळी एसटी महामंडळाच्या २५१ पैकी ३४ आगारांतील आगारप्रमुख हे आपल्या कर्तव्यातून गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गंभीर व निष्काळजी वागणूक मानली जाऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रभात सरनाईक यांनी दिले आहेत.


परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, या अतिवृष्टीमुळे जनतेसमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अशा स्थितीत आगारप्रमुखांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून उपस्थित राहणे अपेक्षित असताना, अनेकांनी अनुपस्थित राहून गैरजबाबदारपणा दाखवला आहे. त्यामुळे तातडीने चौकशी करून दोषींवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई होईल. आगारप्रमुखांच्या गैरहजेरीमुळे प्रशासन अडचणीत आले असून, महामंडळाच्या प्रतिष्ठेलाही तडा गेला आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत, वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. अशा स्थितीत आगारप्रमुखांची उपस्थिती अत्यावश्यक असते. कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रवासीसेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतात. मात्र काही आगारप्रमुख गैरहजर राहिल्याने परिस्थिती हाताळणे कठीण झाले. यामुळे सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला आहे. सरकारी यंत्रणेप्रमाणे एसटी महामंडळालाही बचावकार्य आणि आवश्यक सुविधा पुरविण्यात मोलाची भूमिका बजवावी लागते. त्यामुळे जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत प्रभात सरनाईक यांनी यापुढे कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असेही सांगितले.

याप्रकरणी दोषींवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, विभागीय नियंत्रकांकडून तपास अहवाल मागविण्यात आला आहे. शिस्तीचा अभाव आणि निष्काळजीपणामुळे जनतेला होणारा त्रास टाळण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलणार असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.