वारसा स्थळ घोषित केल्यास जैवविविधता ऱ्हास रोखण्यास मदत –जिल्हाधिकारी

आंजर्ले ता. दापोली आणि वेळास ता. मंडणगड येथील समुद्रकिनाऱ्यांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जैविक विविधता व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले की, जैवविविधता ही पर्यावरणीय सुरक्षा आणि मानवी कल्याणाशी निगडीत असल्याने अशा ठिकाणांची नोंद घेऊन त्यांना वारसा स्थळ म्हणून घोषित करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीचे रक्षण होईल तसेच जलद गतीने होणारा जैवविविधतेचा ऱ्हास रोखता येईल. मौजे आंजर्ले आणि मौजे वेळास या ठिकाणी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी घालण्याची ठिकाणे प्रसिद्ध असून, या कासवांच्या संवर्धनासाठी स्थानिक लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. यामुळे कासवांचे संरक्षण होऊन पर्यटनालाही चालना मिळेल, असे ते म्हणाले. या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र समितीच्या मंजुरीने तातडीने देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) यांनी ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन व त्याचे महत्त्व याबाबत सादरीकरण केले.


आंजर्ले आणि वेळास समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचा निर्णय