बदनामी करणाऱ्या पुढाऱ्यांचा रामदास कदमांनी केला पंचनामा

शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या खेड शहरातील इमारतीची जागा शासनाला परत करावी या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या विरोधकांचा समाचार शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज जमगे येथे पत्रकार परिषद घेऊन घेतला आहे.

खेड शहरातील शिवतेज आरोग्य संस्थेच्या इमारतीची जागा लाटल्याचा आरोप करत व ती जागा शासनाने ताब्यात घ्यावी या मागणीसाठी खेडचे नगराध्यक्ष व मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र या उपोषणाला व जागा लाटल्याच्या आरोपाचे खंडन करीत शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपली व संस्थेची बदनामी करणाऱ्या पुढाऱ्यांचा पंचनामा पत्रकार परिषद घेऊन उघड केला. सदर प्रस्ताव देताना सन 2006 साली मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे शिवसेनेतच होते. ते आपल्या सोबतच काम करत होते असे ही रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. ही जागा देण्याचे आदेश प्रधान सचिव नगरविकास यांनी 30/05/2006 ला जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. 11/07/2006 रोजी खेड नगरपालिकेने एकमताने हा ठराव देखील मंजूर केला होता. तर 07/06/2006 ला महाराष्ट्र शासनाने 99 वर्षाच्या कराराने शिवतेज आरोग्य संस्थेला भाडेतत्वावर जागा देण्याचा शासन निर्णय देखील झाल्याचे रामदास कदम यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यानुसार 05/12/2006 रोजी खेड न. प. च्या मालकीची 1600 चौरस मीटर जागा शिवतेज आरोग्य संस्थेला देण्याचा निर्णय शासनाने घेतला. 08/06/2007 मध्ये जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमून सादर जागेची किमंत 11.20 लक्ष इतकी निश्चित केली होती. त्यानुसार शिवतेज आरोग्य संस्थेला 50% रक्कम म्हणजेच 5.60 लक्ष इतकी रक्कम भरण्याचे आदेश दिलेत. या आदेशानुसार 05/12/2015 रोजी शिवतेज आरोग्य संस्थेने ही रक्कम भरली. या जागेच्या भाड्यापोटी खेड न. प. व शिवतेज आरोग्य संस्था यांच्यामध्ये 100 रुपये प्रतिमाह या दराने भाडे नक्की करण्याबाबत 25/05/2007 रोजी करारनामा झाला. या जागे संदर्भात खेड नगर पालिकेने 06/01/2014 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या अधिसूचनेला पुढील 90 दिवसात एक ही हरकत न आल्याचे प्रमाणपत्र नागरपालिकेकडून शिवतेज आरोग्य संस्थेला देण्यात आले. या जागेवर 15/09/2017 रोजी खेड नगर पालिकेने शिवतेज आरोग्य संस्थेला बांधकामास परवानगी दिल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच 22/10/2018 रोजी खेड न. प. चे मुख्याधिकारी व नागराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी ही जमीन बहुउद्देशीय सभागृह व व्यायाम शाळा या उद्देशासाठी शासनाने आरक्षित करण्याची मागणी ठरावद्वारे आपल्या स्वाक्षरीने शासनाकडे केली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ही जागा व्यायाम शाळा व बहुउद्देशीय सभागृहासाठी आरक्षित केल्याचा निर्णय 06/12/2018 रोजी घेऊन राजपत्रामध्ये प्रसिद्ध ही केल्याचे रामदास कदम यांनी स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की, खेड नगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार उगडकीस आल्यामुळे खेड न. प. चे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी वैफल्यग्रस्त होऊन आपल्या व आपल्या शिवतेज आरोग्य संस्थेची बदनामी करण्याचा डाव आखल्याचे त्यांनी सांगितले. यावर सर्व पुराव्यासह न्यायालयात धाव घेणार असल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment