राज्यात आजपासून पुन्हा जमावबंदी लागू, ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर सरकरचा निर्णय

महाराष्ट्रात ओमयक्रोनच्या पार्श्वभूमीवर व वाढती रुग्णसंख्या पाहून सरकारने शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. आज शुक्रवार 24 डिसेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या जमावबंदी दरम्यान महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या समारंभामध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.  ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आल्याचे समजते.

काय आहेत निर्बंध – 1) राज्यात सर्व ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास बंदी असेल. 2) लग्न समारंभासाठी बंदीस्त सभागृहामध्ये 100 तर मोकळ्या ठिकाणी 250 किंवा क्षमतेच्या 25 % संख्येने उपस्थित राहता येणार आहे. 3) इतर सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना देखील हा नियम लागू असणार आहे. 4) या दोन्ही कार्यक्रमा व्यतिरिक्त होणाऱ्या कार्यक्रमात आसनक्षमतेच्या 50% तर जिथे आसन क्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25% उपस्थिती असेल. 5) खुल्या जागेत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना 25% पेक्षा जास्त उपस्थिती नसेल. 6) क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. 7) वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 च्या आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल. 8) उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. 9) याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील. 10) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

Leave a Comment