खेड आगाराला 55 हजारांचा दंड

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RTO विभागाची कारवाई, 2017 पासून केलेल्या कारवाई बाबत नाराजी

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल परीवर RTO विभागाने कारवाई केल्याने चालक वाहक व महामंडळाच्या कर्मचारी वर्गामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 2017 विविध प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत RTO विभागाने खेड आगाराला 55 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सदरचा दंड हा संबधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश रत्नागिरी विभागाने दिल्याने कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महांडळाच्या खेड आगाराला RTO विभागाकडून रस्ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 55 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदरचा दंड हा सीट बेल्ट, अतिवेगाने वाहन चालवणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, धोकादायक स्थितीत वाहने उभी करणे आशा विविध कारणांसाठी ठोठावला आहे. एकूण 24 वाहनांना हा दंड ठोठावण्यात आला असून या दंडाची रक्कम संबधित व्यक्ती कडून वसूल करण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने दिली आहे. यामुळे चालकांच्या मधून नाराजीचा सूर उमटत आहे. मुळात RTO विभागाने गाड्या पासिंग करताना सीट बेल्ट नसताना कशा काय पसिंग केल्या? असा प्रश्न चालकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. तसेच आम्हाला दंड ठोठावण्या पूर्वी संबधित कार्य शाळेवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी चालक वर्गातून होत आहे. खेड आगारातील कारवाई करण्यात आलेल्या वाहनांची अवस्था सुस्थितीत नसताना देखील पासिंग होत असल्याने कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच 2017 पासूनचा दंड वसूल करण्यासाठी इतके वर्षे का लागली असा प्रश्न खेड आगारातील कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.