
एकाच वेळी दोन्ही संस्थांचे समोरासमोर कार्यक्रम

राकेश कोळी –
खेड सारख्या अधूनिक शहरात जिथे लहान मुलांच्या मनोरंजना साठी साधा बगीचा उपलब्ध नसलेल्या शहरात होणारे फेस्टिवल हेच केवळ शहरवासीयांच्या मनोरंजनाचे साधन शिल्लक राहिले आहे. यापूर्वी शहरात केवळ जेसीआय खेड यांच्याकडून जेसी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत होते. मात्र सन 2024 जानेवारीमध्ये लायन्स फेस्टिव्हलचे देखील लायन्स या सामाजिक संस्थेकडून आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरवासीयांना ह्या वर्षी दोन वेगवेगळ्या फेस्टिवलच्या माध्यमातून मनोरंजनाचा लाभ घेता आला होता. मात्र या दोन संस्थेमध्ये डिसेंबर 2023 मध्ये बॅनर लावण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाल्याचे शहरवासीयांनी पाहिले होते. त्यावेळे पासून या दोन्ही संस्था एकमेकांसोबत स्पर्धा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबतचे वृत्त देखील टाईम्स मराठी न्यूज ने प्रसिद्ध केले होते. मात्र यंदा आयोजित करण्यात येत असलेल्या फेस्टिवल दरम्यान या दोन संस्थांमध्ये आता जोरदार स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळी दोन्ही संस्थांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले असले तरी दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी होणार असल्याने यांच्यातील स्पर्धा किंवा वाद आता जगजाहीर झाला असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण शहरात गेल्या वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून खेड लायन्सचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी लायन्स संघटनेचे महत्त्व वाढवले होते. या उपक्रमातून त्यांना चांगली प्रसिद्धी आणि नावलौकिक देखील प्राप्त झाले होते. मात्र यंदा होणाऱ्या जेसी फेस्टिवल वेळी त्यांनी आपल्या क्रीडा मोहत्सवाचे आयोजन करून त्यांनी जेसी सोबत स्पर्धा करीत असल्याचे दाखवून दिले. खरेतर दोन्ही संघटनेने काल गुरुवार 26 डिसेंबर रोजी सायंकाळी विविध माध्यमातून आपले कार्यक्रम जाहीर केले.
यामध्ये जेसीसने आपल्या फेस्टिवल कार्यालयाचे उद्घाटन करून तर लायन्सने पत्रकार परिषद घेवून क्रीडा मोहत्सव जाहीर केला. मात्र जेसीस या सामाजिक संस्थेने खेड शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करून आपल्या तारखा यापूर्वीच म्हणजे 17 डिसेंबरला जाहीर केल्या होत्या. तर लायन्सने 26 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेवून आपल्या तारखा जाहीर केल्या. हा वाद एवढ्या पुरता मर्यादित न राहता दोन्ही संघटनांनी आपले कार्यक्रम शहरातील एकच मैदानावर घेतल्याने यांच्यातील स्पर्धा आता टोकाला पोहचल्याचे पहावयास मिळत आहे. खरेतर शहरतील महाड नाका येथील एस टी डेपोचे ग्राउंड म्हणजे गोळीबार मैदान म्हणून परिचित असणाऱ्या मैदानात हे फेस्टिवल आयोजित केले जातात. तर त्या बाजूलाच असणाऱ्या क्रीडा संकुलाच्या जागेत फेस्टीवलसाठी येणारे नागरिक आपली वाहने पार्किंग करीत असतात. फेस्टिवलच्या कालावधीत नेहमी अंधारात असलेले हे मैदान मात्र झगमगुन उठते. मात्र यंदा सर्वात आधी जेसी फेस्टिवलने आपल्या कार्यक्रमाची तारीख जाहीर केली असताना देखील लायन्सने आपला क्रीडा मोहत्सव याच दरम्यान जाहीर केला. एवढ्यावरच न थांबता जेसी फेस्टिवल होणाऱ्या ग्राउंड समोरील क्रीडा संकुलाचे ग्राऊंडवर ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली. खरेतर या क्रीडा संकुलाच्या मैदानाचा वापर गेले अनेक वर्षे जेसीआय ने फेस्टीवलसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंग केला होता. इतकेच नव्हे तर 2024 मध्ये पार पडलेल्या लायन्स मोहत्सवामध्ये देखील याच जागेचा वापर वाहन पार्किंग साठी करण्यात आला होता. मात्र आता ही जागा क्रीडा मोहत्सवास घेवून एकप्रकारे लायन्सने जेसीआय खेडची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे पहावयास मिळत आहे.

याबाबत दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यां कडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही संघटनेने आपले कार्यक्रम हे पूर्व नियोजित असल्याचे स्पष्टपणे सांगितले. तर खेड जेसिस फेस्टिवल देखील पूर्व नियोजित असून 5 ऑक्टोंबर रोजी सर्व प्रथम फेस्टिवलच्या तारखांची माहिती शहरातील व्हॉट्स ऍप या सोशल मीडियावर जाहीर केल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर लायन्सच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपले वर्षभरातील कार्यक्रम जुलै मध्ये शेड्युल्ड केल्याचे सांगितले. सर्व प्रथम आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लायन्स मिसळ फेस्टिव्हलचे आयोजन केल्याचे सांगत असताना त्यांनी जेसी फेस्टिव्हलची तारीख जाहीर झाल्याने आपला मिसळ फेस्टिवल रद्द करून मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या जेसी फेस्टीवलसाठी आम्ही एक पाऊल मागे घेवून आमचा मिसळ फेस्टिवल रद्द केल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना आठवणीने सांगितले. तर यावेळी बोलताना दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संघटनेची नावे देखील आपल्या तोडत घेणे टाळल्याचे पहावयास मिळत होते. तसेच दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आमच्या कोणतेही मतभेद नसून आमच्यात सलोखा आहे हेही त्यांनी आवर्जुन सांगितले. माञ बोलणे आणि कृती यातून त्यांच्यातील मतभेद हे स्पष्ट पणे जाणवत होते. यावेळी या दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एकमेकांशी चर्चा करून हे कार्यक्रम रिषेड्युल्ड करता येतात का पाहा असे सांगताच त्यांनी मात्र आता आमचे नियोजन पूर्ण झाले असून आता कार्यक्रम आम्ही रिषेड्युल्ड करू शकत नसल्याचे देखील सांगितले. मात्र मिसळ मोहत्सव्
रिश्येड्युल्ड होता तर क्रीडा मोहत्त्सव कुठून आला. जर लायन्स ने एक पाऊल मागे घेवून मिसळ मोहत्सव रद्द केला तर मग क्रीडा मोहत्सव का? असा प्रश्न देखील या निमित्त उपस्थित होत आहे. यावेळी दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ठीक आहे आम्ही विचार करतो काही करता येते का ते पाहतो असे सांगण्याचे साधे औपचारिकता देखील न दाखवल्याने यांच्यातील स्पर्धा, संघर्ष किंवा वाद याच्यावर शिक्कामोर्तब होतो हे मात्र निश्चित.
या दोन्ही संघटनेतील वादामुळे किंवा अपापसातल्या स्पर्धेमुळे नुकसान मात्र या दोन्ही संघटनेचे व तालुका वसियांचे होणार हे मात्र निश्चित. कारण हे दोन्ही कार्यक्रम एकच वेळी आयोजित केल्याने क्रीडा वासियांना व तालुकावासियांना एकावेळी एकच कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. क्रीडाप्रेमी आपल्या कुटुंबासह फेस्टीवलला भेट देतील की क्रीडा स्पर्धांचा आनंद घेतील हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडल्यावाचून राहणार नाही. तर हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केल्याने कार्यक्रमंना येणारे पब्लिक देखील विभागले जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. यांच्या आपसातील स्पर्धेमुळे उत्कृष्ठ काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या नावाला देखील हानी पोहचण्याची शक्यता असल्याचे सध्या चर्चिले जात आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांनी एकमेकांशी पुन्हा समन्वय साधून आपल्या कार्यक्रमाच्या तारखा ऍडजस्ट होतात का हे पाहावे जेणेकरून तालुकावासियांना या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ घेता येईल असे मत सध्या शहरातील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
©️2024 Times Marathi News, Media Network
Editor – Rakesh Koli
Rg.No.MH-28-0054845
Khed, Ratnagiri
ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा