
खेड शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दोन विविध संस्थांनी आपले विविध महोत्सव एकाच वेळी जवळ जवळ ठेवल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. खेड शहरात असणाऱ्या महाड नाका परिसरातील मैदानात होणाऱ्या कार्यक्रमांना नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या कार्यक्रमासाठी येणारे नागरिक आपल्या विविध वाहनांसह या ठिकाणी येतात. सध्या शहरात फेस्टिवलची क्रेझ सुरू आहे. वर्षाच्या सुरुवातीला खेड वासीयांना अपेक्षित असलेला आणि जिव्हाळ्याचा फेस्टिवल दरवर्षी याच मैदानात भरतो. यंदा मात्र फेस्टिवलसह क्रीडा कार्यक्रमांचे देखील या ठिकाणी अन्य एका संस्थेने आयोजन केले आहे. दरवर्षी पार्किंग साठी वापरण्यात येणाऱ्या जागेत यंदा क्रीडा स्पर्धा होणार आहेत. मात्र समोरासमोर असणाऱ्या दोन्ही जागेच्या मध्ये असणारा रस्ता हा देखील अरुंद असून या ठिकाणी जाण्यास असणारा मार्गही मुख्य मार्गापासून अरुंद आहे. या कार्यक्रमादरम्यान एखादी आपत्ती उद्भवल्यास या ठिकाणी मदत कार्य पोहोचणे देखील मुश्किल होणार आहे. तसेच याच परिसरात शहरातील एकमेव कॉर्डियोलॉजिस्ट दवाखाना असल्याने अत्यंत गंभीर परिस्थितीत असणारे रुग्ण देखील या ठिकाणी उपचारासाठी दाखल होतात. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर खेड वासीयांना असणारा एकमेव आधार म्हणून या रुग्णालयाकडे पाहिलं जाते. मात्र यंदा आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमामुळे या रुग्णालयाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होणार यात तीळ मात्र देखील शंका नाही.

नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या या संस्था या ठिकाणी आपले महोत्सव साजरे करत असताना जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारासाठी रुग्णालयात या मार्गावरून जात असताना या ठिकाणी झालेली गर्दी व वाहतूक कोंडीमुळे एखाद्या रुग्णाचा जीव दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. खरे तर दोन्ही संघटनांनी शहरासाठी काम करत असताना सर्वप्रथम शहरवासी यांचा विचार करणे गरजेचे असताना देखील सद्यस्थितीला या संघटना व त्यांचे पदाधिकारी केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या संघटनांच्या कार्यक्रमाचा विचार करताना पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमा दरम्यान एखाद्या रुग्णाचा रुग्णालयात जाताना किंवा या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास मदतीआभवी जर एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? याची माहिती या दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येऊन शहरासह तालुक्यातील जनतेला द्यावी अशी अपेक्षा देखील सर्वसामान्य जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.





