

खेड तालुका पत्रकार संघात अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेल्या वादामुळे संघात फूट पडली असून, तालुक्यात नव्या पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. मराठी पत्रकार संघ खेड या नव्या संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुवर्य दिवाकर प्रभू यांची एकमताने निवड करण्यात आली.

अवघ्या दोन दिवसांपूर्वी खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र, काही सदस्यांचा आरोप आहे की या निवडी प्रक्रियेत अन्य सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी करण्यात आली. या प्रकारामुळे नाराज झालेल्या पत्रकारांनी स्वतंत्र पत्रकार संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

रविवारी जिल्हा परिषद विश्रामगृहात झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने मराठी पत्रकार संघ स्थापन करण्यात आला. यावेळी गुरुवर्य दिवाकर प्रभू यांची अध्यक्षपदी, गोविंद राठोड आणि ज्ञानेश रोकडे यांची उपाध्यक्षपदी, देवेंद्र जाधव यांची सचिवपदी, तर जितेश कोळी यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.

संघटनेच्या स्थापनेनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शहराध्यक्ष कुंदन सातपुते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विनायक निकम यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि संघटनेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नव्या संघटनेच्या स्थापनेमुळे तालुक्यातील पत्रकारांसाठी नवे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे.
