
कल्याण स्टेशनवरील स्कायवॉक वर मराठी तरुणाशी मराठी भाषेत बोलण्यावरून वाद घालत त्याला परप्रांतिय फेरीवाल्यांच्या टोळक्याने गैरवर्तन करत मारहाण केली होती. याची तक्रार या तरुणाने मनसे सैनिकाकडे करताच त्यांनी तात्काळ कल्याण स्टेशन गाठून या परप्रांतिय फेरीवाल्यांना बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिंद येथे राहणारा एक विद्यार्थी कल्याणमध्ये काही कामानिमित्त आला होता. त्यावेळी त्याने कल्याण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्याकडून एक वस्तू विकत घेतली होती. ती वस्तू खराब असल्याने तो विद्यार्थी पुन्हा कल्याणमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याने ती वस्तू बदलून देण्यासाठी फेरीवाल्याकडे विनंती केली. मात्र फेरीवाल्यांनी ती वस्तू बदलून देण्यास नकार दिला. यावेळी त्या फेरीवाल्या ने “तुम मराठी लोक ऐसे ही होते हो”, असे बोलून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान केला. या विद्यार्थ्याने या घटनेची माहिती कल्याण पूर्वमधील मनसे कार्यकर्त्यांना दिली व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कल्याणमधील मनसे कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरात जावून त्या फेरीवाल्याला जोरदार चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले