आज ७ सप्टेंबर रोजी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण –  श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर डॉ. योगेश्वरानंदगिरी महाराज

भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतात स्पष्टपणे दिसणार असल्याने त्याला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने मोठे महत्त्व आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होऊन पहाटे १ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील. एकूण ३ तास २९ मिनिटे अशी या ग्रहणाची कालावधी असेल.

या चंद्रग्रहणाचा सूतक काल दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनीच सुरू झाला आहे. सूतक काळात सर्व शुभकार्ये वर्ज्य मानली जातात. तसेच या काळात अन्नग्रहण न करण्याची सूचना शास्त्रात केली आहे. याशिवाय ग्रहणाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांपासून ते ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहुकालही राहणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण कुंभ राशीत व पूर्वाभाद्रपद नक्षत्रात लागेल. त्या वेळी चंद्र व राहु युतीत असल्याने ग्रहणयोगाची निर्मिती होणार आहे. यामुळे या ग्रहणाचा परिणाम तीव्र राहील असे मानले जाते. या अशुभ प्रभावापासून मुक्तीसाठी व मानसिक शांतीसाठी चंद्रदेवांच्या १०८ नामांचा स्मरण किंवा मंत्रजप करणे अत्यंत हितकारक असल्याचे सांगितले जाते. ग्रहण आणि सूतक काळात विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी घराबाहेर न पडता काळजी घेणे आवश्यक असल्याची सविस्तर माहिती श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर डॉ. योगेश्वरानंदगिरी महाराज यांनी दिली आहे.